मंदिरे हीच समाजकल्याणाची
भक्कम केंद्रबिंदू आहेत.
_____________________
हिंदू मंदिर! प्रत्येक हिंदूच्या जिव्हाळ्याचा आणि स्वाभिमानाचा मुद्दा असतो. कोणत्या ना कोणत्या मंदिरावर, देवस्थानावर आपली श्रद्धा असते. कुठेच न झुकणाऱ्या मानादेखील पंढरपूरच्या विठोबासमोर नतमस्तक होतात आणि ही मंदिरे आपल्याला एक वेगळी सकारात्मक ऊर्जा देऊन जातात.
पण आपल्या समाजात मंदिरे न आवडणारे, आपले देव न आवडणारे, आपला हिंदू धर्म न आवडणारे, हिंदू विरोधकदेखील अनेक आहेत. बरं हे नुसतेच विरोधक नसून सतत आपल्या संपर्कात येणाऱ्या लोकांना नकारात्मक बनवण्याच्या मागे हात धुवून लागेलेले असतात त्यामुळेच आपण हिंदू सण साजरा करण्याच्या आनंदात मश्गुल असतो आणि हे नमुने, संबंधित सण साजरा करू नका म्हणून कंड्या पिकवत असतात. यातले अनेक प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या ब्रेकिंग इंडिया फोर्सेसशी जोडलेले असतात याची आपल्याला कल्पनाही असत नाही.
गेल्या काही वर्षात अश्याच असमाधानी, असंतुष्ट, अपप्रचाराला बळी पडलेल्या अनेकांनी सतत मंदिरांमधील सोन्याबाबत बऱ्याच खऱ्या-खोट्या बातम्या पसरवल्या. हिंदू मंदिरांमध्ये मजबूत दानधर्म होतो आणि मंदिरे ही संपत्ती दाबून ठेवतात असा अपप्रचार सतत होत राहिला तर एक दिवस मंदिरांमधील या संपत्तीसाठी हाणामाऱ्या होताना पहाव्या लागल्या तर मला आश्चर्य वाटणार नाही.
मुळात या विरोधाला कसलाही फॅक्टसचा आधार असत नाही. अनेकांना हे देखील माहिती असत नाही की हिंदू मंदिरे हजारो किलो सोने नियमितपणे सरकारकडे डिपॉजिट करतात, सर्वच्या सर्व सोनं, अलंकार डिपॉजिट करणे शक्य असत नाही. ही मंदिरे प्रत्येक नैसर्गिक संकटाच्या वेळी कोट्यावधी रुपयांची मदत सरकारला करतात. पण तरीही या लोकांमध्ये हिंदूंबद्दल असंतोष आणि असूया असतेच!
अजून खोल निरीक्षण केल्यास, ज्यांना मंदिरे आवडत नाहीत, जे हिंदू विरोधक आहेत, त्यांच्या देशावरच्या निष्ठा तपासल्यास अनेकदा भुईमुगाच्या शेंगाच हाती लागतात. मग जेव्हा बालाकोटसारख्या घटना घडतात तेव्हा अश्या लोकांचा भारत-विरोध शत्रूसाठी स्कोअरींग पॉईंट ठरतो. नेहमी ट्विटरवर असाल तर अनेक भारत विरोधी गोष्टींसाठी हजारोंचे ट्रेंड बघायला मिळतील.
यावर उपाय काय? तर यावरचा 'एक' उपाय स्वतः हिंदू मंदिरांकडेच आहे! हा असंतोष कमी होईल किंवा आपली फॉलोविंग वाढेल, यासाठी मंदिरांनी स्वतःला अपडेट ठेवणे, आधुनिकतेकडे वळणे गरजेचे आहे. प्रत्येक मंदिरासाठी, प्रत्येक देवस्थानासाठी मोठे दबाव गट बनणे गरजेचे आहे. त्याचबरोबर मंदिरांनी हुशारीने खेळणे गरजेचं आहे.
लक्षात ठेवा, मंदिरे ही समाजकल्याणाची केंद्रबिंदू आहेतच पण अधिकाधिक सक्षम व्हावीत!
असं झालं तर आहे तो विरोध, असंतोष कमी होईल नाहीतर तो कायम कागदावरच सडत राहील, त्याकडे दुर्लक्ष करता येईल.
काय करता येईल?
सर्वप्रथम देवस्थानांच्या ट्रस्टसने डावं-उजवं राजकारण काय प्रकार आहे हे नीट समजुन घ्यायला लागेल! आपलं मंदिर ज्या गावात, शहरात असेल तिथल्या पंचक्रोशीतील समाजकारणाचा, राजकारणाचा मजबूत अभ्यास करावा लागेल, मंदिरांचं काम अधिकाधिक लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवावं लागेल.
● प्रत्येक देवस्थानाने सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असणे गरजेचेच आहे. आपला ऐतिहासिक ठेवा, मग फोटो असतील, वस्तू असतील, जुनी भांडी असतील, ऐतिहासिक पत्र व्यवहार असतील, देवांचे अलंकार असतील, नेहमी मिळणाऱ्या भेटवस्तू असतील, अर्काइव्हज असतील बाहेर काढा, सोशल मीडियावर नियमितपणे त्याचे फोटो टाका, लाइव्ह दर्शन सुरू करा. फक्त रोजचा एक फोटो टाकला म्हणजे जबाबदारी संपली असं होत नाही.
● देवस्थान करत असलेल्या सामाजिक कार्याची वेळोवेळी माहिती द्या, मंदिर ट्रस्ट चालवत असलेल्या वृद्धाश्रमांची, अनाथालयांची माहिती समोर येऊ द्या. देवस्थानची लोकप्रियता आणि फॉलोवर्स अधिकाधिक कसे वाढतील यावर लक्ष द्या. सोशल मीडियाचा फायदा म्हणजे संबंधित देवस्थानचे विदेशातील फॉलोवर्सदेखील जोडायला मदत मिळू शकेल.
● मंदिरांसोबतच असंख्य हिंदू संतांचं काम जनसामान्यांपर्यंत पोहोचेल याची काळजी घेणेदेखील तितकेच आवश्यक आहे. ही जबाबदारी हिंदू बांधवांनी उचलणे गरजेचे आहे.
● बहुसंख्य मंदिरे, देवस्थान ट्रस्टस मंदिराच्या परीसरातच धार्मिक, वैद्यकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक, नववर्ष यात्रा, ग्रंथालय, अन्नछत्र असे उपक्रम गेली कित्येक वर्षे राबवत आहेत, जे कौतुकास्पद आहे. पण हे लोकांच्या सतत डोळ्यासमोर असू द्या. आपण केलेलं काम लोकांपर्यंत पोहोचत नसेल तर ते आपलं अपयश आहे. मग आपण मोदींकडून काय शिकलो? सामाजिक कामाची जाहिरात होणे त्यातून इतरांना ऊर्जा, प्रेरणा मिळणे गरजेचे आहे. काही मंदिरे जर सरकारी हस्तक्षेपामुळे बॅकफूटवर असतील तर त्यांनी इतर मंदिरांपासून आदर्श घेऊन काम करावे.
● किती मंदिरांनी कोरोना काळात आर्थिक आणि अन्नधान्याच्या बाबतीत मदत केली माहिती आहे?
१. कांची मठ
२. महावीर मंदिर ट्रस्ट
३. माता वैष्णोदेवी मंदिर ट्रस्ट
४. महामाया मंदिर ट्रस्ट
५. सोमनाथ मंदिर ट्रस्ट
६. अंबाजी मंदिर ट्रस्ट
७. श्री. साईबाबा संस्थान ट्रस्ट
८. देवस्थान मॅनेजमेंट कमिटी - कोल्हापूर
९. बाबा रामदेव
१०. स्वामी नारायण मंदिरे
११. मन्नरगुडी जियार स्वामी
१२. राणी सती मंदिर
१३. श्री. माता मनसा मंदिर
ई. ई. ई.
ही केवळ माहिती असलेली नावे आहेत..अशी असंख्य मंदिरे आज आपली सामाजिक जबाबदारी ओळखून काम करत आहेत.
● आयुष्याला कलाटणी देणाऱ्या काही ठराविक घटना असतात, उदा. शिक्षण, नोकरी, लग्न, आरोग्य. यातील नोकरी, बेरोजगारी या मुद्द्यासाठी जर देवस्थान ट्रस्टसने विशेष प्रयत्न केले तर देवस्थानांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलायला अजून मदत मिळेल.
● एखाद्या हिंदू संस्थेकडून/ट्रस्टकडून/मंदिराकडून आपल्याला काही फायदे मिळाले, त्यावर आपण आयुष्यात उभे राहू शकलो ही कृतज्ञतेची भावना, अँटी हिंदू सेंटीमेंटशी लढायला मदत करेल. लोकांना देववेडे न बनवता देखील देश आणि धर्माशी लोक अप्रत्यक्षरित्या जोडता येतील.
हे सर्व केवळ, भक्कम दबाव गट बनण्यासाठी! अजून पुढे जाऊन सांगतो, नरेंद्र मोदी निवडून येण्यात त्यांच्यासाठी उत्प्रेरक म्हणून काम करणाऱ्या घटकांचा तितकाच मोठा हात आहे. मंदिरे, देव, धर्म त्या अनेक उत्प्रेरकांपैकी एक आहेत. काही केल्या मोदी हटत नाही म्हटल्यावर जसे मोदी समर्थकांवर हल्ले सुरू झालेत, संतुलित आणि फॅक्ट मांडणाऱ्या पत्रकाराना वाळीत टाकण्याचे उद्योग सुरू झालेत तसेच भविष्यात अश्या उत्प्रेरकांवर हल्ले सुरू होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दोन वर्षांपूर्वी केरळमध्ये भर चौकात केवळ खुन्नस म्हणून वासरू मारलं गेलंय! हे आम्ही अजून विसरलो नाहीत.
मंदिरांनी लक्षात ठेवावं की मंदिरे हिंदू द्वेषाला, हिंदू विरोधी राजकारणाला गेली शेकडो वर्षे बळी पडली आहेत, मंदिरे तोडली गेलीत, देवतांच्या मूर्ती फोडल्या गेल्यात, आता वेळ आहे मंदिरांनी मुत्सद्देगिरी आणि राजकारण करायची. प्रत्येक लढाई ढाल-तलवार हातात घेऊन लढली जाऊ शकत नाही, २०२० मध्ये तर नाहीच!